Monday, April 1, 2013

तुझ्या मिठीत अस्ताला जाणारा सूर्य
मला देऊन टाक ..
उजाडेल म्हणून भलत्याच दिशेला 
निघालो होतो .........
रस्त्यात अंधार हि झोळीत भरता येत नाही.
झोळी भरली की तुझा सूर्य तुला देऊन टाकीन.
तो पर्यंत माझ्या जखमा भरून येतील !

9 comments:

  1. ओली जखम अजूनही
    भळभळतेच आहे आत !

    इतकी कि ती टिपून
    त्यातून तुला चितारता येईल,
    एखादं मोर ..आणि ..
    त्याचा पिसारा ही !.....

    ...किंवा एखादा लहानसा ठिपका.
    ज्याला सूर्य म्हण्यायला तूच शिकवलसं !

    कधी घातला असेलही
    मी एखादा टाका ...
    तो टाका जाता येता दिसत राहतो फक्त !

    त्याच्या कडून नाती उसवायची कला शिकून
    तू मात्र चालती झालीस ..

    तो कधीचा खोळंबलाय ..

    आता ओल्या जखमा दोन झाल्यात
    एक त्याची एक माझी .....!

    - - प्रसाद दाबके

    ReplyDelete
  2. अर्धवट राहिलेल्या दोहांच्या ओळी

    कानात सतत गुणगुणत असतात

    एका पडक्या अवशेषा बाहेर ..

    अडगळीत पडलेल्या कबीराला

    मात्र त्याचे काहीही नसते ..

    कदाचित विणले असतेही मी ते

    अर्धवट धागे ...

    पण पाठीमागच्या भिंतीवर लिहिलेले

    ते मात्रांचे हिशेब ?

    त्या वाळलेल्या रक्ताचे व्रण कबीराच्या पाठीवर

    तसेच असतात.



    आणि मी त्याच्या वेदनेचं ओझं घेऊन

    भटकतोय रानोमाळ...

    जणू एखादा शाप असल्या सारखा !

    ReplyDelete
  3. क्षणभर प्रेम केले इतुकाच
    माझा गुन्हा होता !
    प्राक्तनाला अमुच्या भंगण्याचा शाप होता ?
    वाहिली फुले
    तिच्या रिक्त ओंजळीत मी वाहिली
    न फुलण्याचा त्या निशिगांधलाच शाप होता ..
    जायचे सोडून मजला
    हा गाव सोडून जायचे
    वाटेत भोग सांडलेले
    की जगण्याचा भास होता !

    ReplyDelete
  4. रात्री जागून काढणं बरं नाही
    तो चंद्र ही नसतो आजकाल
    राहिलेल्या आठवणींचे काही
    तुकडे मोजत बसतो मग ..
    ओंजळीत रहिलेली प्राजक्ताची फुले ..
    काही स्पर्श ती विसरून गेलेली ..
    थोडे भास ..
    काही वायदे ..
    काही श्वास ..मागे रेंगाळलेले ..
    थोडा तिने गायलेला पुरियाही
    काही संध्याकाळ खोल उराशी जपलेल्या
    मग जोडताना कळतं कि एखादा
    तुकडा तिच्याकडेच विसरला असेल का ?
    म्हणून मग मी रोज रात्री
    पुन्हा पुन्हा मोजत बसतो ..
    रोज रात्री .....

    ReplyDelete
  5. स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात


    निघालेल्या मला


    जेंव्हा तू एखादी लहानशी ठिणगी...


    होऊन मिठीत घेतेस ..


    त्या वेळेला माझ्या राखेतला


    लहानसा कण बघून


    कोणी ही सांगू शकेल

    "काल इथे वणवा पेटला होता.."

    ReplyDelete
  6. रंग विकायला ठेवले आहेत ..
    ऐकत नाहीत आजकाल
    वाहत जातात ...बेफाम ...
    वळण न लावलेल्या मुलांप्रमाणे ..
    बेशिस्त ...किंवा दिशाहीन
    भरकटणाऱ्या ..पतंगा प्रमाणे..
    हात धरून नेतात मलाही ..
    त्यांच्या बरोबर ..लांब .
    सोबतीची भाषा करतात . ....
    आणि माझ्या मागे ...माझाच
    दर आपापसात ठरवतात...
    ...रंग विकायला ठेवले आहेत

    ReplyDelete
  7. तुझ्याकडे गहाण ठेवलेला मारवा
    काल बेवारस अवस्थेत सापडला...
    विचारलं तर...
    रडून म्हणाला..ती तिच्याकडचे
    षड्ज-पंचम माझ्या गळ्यात बांधू पाहत होती ..

    - Prasad dabke...

    ReplyDelete
  8. एका छोट्याश्या कवितेला रात्रभर शिक्षा केली
    पुढची ओळ काही सुचत नव्हती ..म्हणून

    सकाळी उठून पाहिलं तर गाणं तयार झालं होतं

    ReplyDelete
  9. जेंव्हा जेंव्हा हरवलेल्या दिशांची भयाण सावली ,
    घालते झडप माझ्या नशिबावर ..
    तेंव्हा तेंव्हा मी फेकला जातो , एका अखंड भयाण पोकळीत
    जिथे एका बाजूस श्वास
    तर दुसऱ्या बाजूस असते मरणवेळ
    मधल्या रस्त्यांवर मात्र चालू असतो
    जगण्याचा फसवा खेळ.
    कुठूनशी येते तिची हाक , गुदमरलेल्या षडजासारखी..
    मी मात्र अंधार कुशीत घेऊन शांत झोपलेला असतो..मेल्यासारखा.

    ReplyDelete